कापडणीस पिता पुत्र हत्याकांड; पोलीस आता आणखी तीन साथीदारांच्या शोधात
नाशिक (प्रतिनिधी): कापडणीस पिता पुत्र हत्याकांड प्रकरणी पोलीस आता अजून तिघांच्या मागावर आहेत.
मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस व त्यांचे पूत्र डॉ. अमित यांच्या दुहेरी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार राहुल जगताप याला दोन हत्या आणि मृतदेहासह पुरावे नष्ट करण्यास मदत करण्याचा संशय असलेल्या तिघांच्या मागावर पोलिस आहेत.
हे तिघे परराज्यात पळून गेल्याच्या संशयावरून पोलिसांनी पथके रवाना केल्याचे समजते.
दरम्यान, शेजारील राज्यात एकाचे लोकेशन मिळाले. मात्र, पोलिस तेथे पोचण्यापूर्वी संशयितांपैकी एकाने ठिकाण बदलल्याची चर्चा आहे.
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार राहुल जगताप हा सध्या न्यायालयीन कोठडीत नाशिक रोडला मध्यवर्ती कारागृहात आहे. पण, त्याला या संपूर्ण प्रकरणात विविध प्रकारे मदत करण्यात आणखी तिघांचा सहभाग असल्याचे तपासात पुढे येत आहे. त्या तिघांपैकी एकाचा भाऊ गंभीर गुन्ह्यात कारागृहात असल्याने पोलिसांनी संशयिताला मदत करणाऱ्या त्याच्या तिघा मित्रांचा तपास सुरू केला आहे. या तिघांची नावेही पुढे आली आहेत. मात्र, ते फरारी असल्याने पोलिस नावाबाबत गोपनीयता बाळगून आहेत. या तिघांच्या अटकेनंतर आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची अपेक्षा पोलिसांना आहे. त्यामुळे सरकारवाडा पोलिसांनी परराज्यांत तीन पथके पाठविली आहेत.