नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकरोड परिसरात राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेचे एटीएम कार्ड एक्स्चेंज करून वेळोवेळी एकूण ६१ हजार २३ रुपये काढून घेतल्याचा प्रकार घडलाय. लता विजय केदारे (रा. एकलहरा रोड, अरिंगळे मळा) असे वृद्धेचे नाव आहे. या प्रकरणाच्या विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार महिला आणि त्यांचे पती रात्री २ वाजेच्या सुमारास नाशिकरोड रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथे हेल्मेट आणि टीशर्ट घातलेला अनोळखी व्यक्ती आला. त्याने महिलेचा गोपनीय एटीएम पिन पाहून घेतला. त्यानंतर संशयिताने हातचालाकी करून स्वतःकडचे एटीएम कार्ड महिलेला दिले आणि महिलेचे एटीएम कार्ड घेतले व तेथून निघून गेला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणहून थोडे थोडे पैसे काढत संशयिताने एकूण ६१ हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणा विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सैय्यद हे पुढील तपास करत आहेत.