आर्मी ऑफिसर असल्याचे सांगत लसीसाठी घातला गोंधळ

नाशिक (प्रतिनिधी): कोरोना लसीकरण केंद्रात आर्मी ऑफिसर असल्याचे सांगत पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार नानेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला. याप्रकरणी संशयित गोरख सखाराम आडके (रा. नानेगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि हवालदार विवेक साळवे यांच्या तक्रारीनुसार नानेगाव लसीकरण केंद्रात संशयित गोरक्ष सखाराम आडके यांनी रांगेत न येता मला लस द्या, असे सांगत लसीकरणात अडथळा निर्माण केला. याबाबत साळवे यांना माहिती मिळाली. त्यांनी आडके यांना समजावून सांगितले. मात्र, त्यांनी मी लष्करी अधिकारी आहे. मी रांगेत येणार नाही मला येथेच लस द्या, असे सांगत साळवे आणि त्यांचे सहकारी कर्मचारी गारे या दोन पोलिसांना ध’क्काबु’क्की करत त्यांचा गणवेश फाडून सरकारी कामात अडथळा आणला. संशयित आडकेच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.