नाशिक (प्रतिनिधी): हेल्थ टेक्नोलॉजी अहवालातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा जागतिक स्तरावरील पुरस्कार बायोटेक्नोलॉजीत अतुलनीय योगदान देणाऱ्या व नाशिकमध्ये कार्यरत स्वाती देशपांडे यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या कार्याची दखल हेल्थ टेक्नोलॉजी मॅगझीनने देखील घेतली आहे.
द हेल्थकेअर टेक्नोलॉजी अहवालाने नुकतेच यंदाच्या वर्षात बायोटेक्नोलॉजी क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या जगभरातील टॉप २५ महिला नेतृत्वांच्या नावांची घोषणा केली. यावर्षी पुरस्कारांसाठी निवडलेल्या कर्तृत्ववान महिलांनी त्यांची व्यावसायिक कामगिरी आणि संस्थात्मक पातळीवर योगदान देत स्वत:ला सिद्ध केले आहे.
कर्तृत्वच्या आणि उद्दमशीलतेच्या बळावर या क्षेत्रात कार्याचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या महिलांच्या शेकडो नामांकानांमधून देशपांडे यांची निवड झाली आहे. वैद्यकीय तपासणीसाठी UKAS, NABL, CAP, CLIA आणि ISO मानांकनासह उच्च दर्जाचे बेंचमार्क स्थापित करण्यात देशपांडे यांचे योगदान राहिले आहे. त्या मुळत: वकील असून मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांनी कायद्याचा सरावही केला आहे.
मुंबई विद्यापीठातून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी घेतली असून इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये हेल्थकेअर मॅनेजमेन्ट प्रोग्राम पूर्ण केला आहे. स्वाती देशपांडे ह्या नाशिकच्या दातार कॅन्सर जेनेटिक्समध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.