नाशिककरांनो आता तरी आपण सुधारणार आहोत का ?

सई जाधव, नाशिक
लॉकडाऊन शिथिलीकरण काही प्रशासकीय नियमांच्या अंतर्गत ३ मे ला करण्यात आले. या लॉकडाऊनच्या शिथिलीकरणाचा उद्देश हा भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणे असा आहे. पण बऱ्याच लोकांनी याचा अर्थ ‘कोरोना गेला’ असाच घेतलेला दिसतो. नाशिकची सद्य परिस्थिती बघता ग्रोसरी शोप्स, भाजी मार्केट, मेडिकल्स, वाईन दुकानांच्या बाहेर ज्या पद्धतीने कोणतेही फिजिकल डिस्टंसिन्ग न पाळता किंवा मास्क न वापरता लोकं वावरत आहेत, खरं तर नाशिककरांसाठी अत्यंत हे चिंताजनक आहे. बऱ्याच ठिकाणी तर असंच दिसतंय.

ही लोकं अक्षरश: गाडी भरून इकडून तिकडे फिरताय… शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत, की चार चाकीमध्ये ड्रायवहारसह तीन लोकं प्रवास करू शकतात तर दुचाकीवर एकच. त्यासोबतच शासनाने हे देखील सांगितले आहे कि लहान मुले आणि वयोवृद्ध लोकं यांनी घराबाहेर पडू नये. पण ज्या पद्धतीने समाज किंवा सुशिक्षित लोक या सर्व सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत, तो शुद्ध अडाणीपणाच आहे. आतापर्यंत नाशिकमध्ये किंवा अन्य ठिकाणी बऱ्याच कोरोनाबाधितांना कुठलीही लक्षणे दिसून आली नव्हती, अशा पेशंटला सायलेंट कॅरीअर म्हंटले गेले. म्हणजेच असे समाजात कितीतरी सायलेंट कॅरीअर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेच सायलेंट कॅरीअर जेव्हा कमी इम्युनिटी असणाऱ्या लहान मुलं, वृद्ध किंवा इतरांच्या संपर्कात आले तर नक्कीच या लोकांना कोरोनाचा धोका अधिक होऊ शकतो.. त्याला जबाबदार कोण असणार…? वारंवार कम्युनिटी स्प्रेडबद्दल माध्यमांद्वारे सांगितलं जात असूनही लोकं काही सुधरायला तयार नाहीत..  “आपली इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, आपल्याला काही होत नाही” अशा आविर्भावात अनेकजण आहेत… पण तुमच्यामुळे तुमच्या जवळचे, घरातले, समाजातले अनेक लोक एफेक्ट होऊ शकतात याची भीती कशी बरं वाटत नाही ? आणि हे सगळं होत असतांना पोलीस, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग यांच्यावरसुद्धा ताण पडतोय, हे आपण लक्षात घ्यायला हवं.. अर्थचक्र तर सुरु राहायलाच हवं पण शासनाने दिलेले नियम पाळून..

जर हे बेजबाबदार वागणं असंच सुरु राहिलं, तर नाशिकमध्ये लवकरच सर्वत्र कंटेनमेन्ट झोन दिसतील आणि येत्या एक महिन्यात नाशिकची परिस्थिती अतिशय धक्कादायक आणि भयावह असू शकते. आजच म्हणजे ९ मे २०२० कोरोनाचा अजून एक बळी गेलाय.. आता तरी आपण सुधारणार आहोत का ? परिस्थितीला गांभीर्याने घेणार आहोत का ?