ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच आजारी व्यक्तींसाठी महापालिकेतर्फे अन्न व औषधांची व्यवस्था !

नाशिक महानगरपालिकेतर्फे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच आजारी व्यक्तींसाठी अन्न पुरवठा तसेच औषधांची व्यवस्था यासाठी मदत कक्ष उभारण्यात आला आहे. राज्य कोरोन नियंत्रण कक्षाचे सचिव व समन्वयक यांनी याबाबत सूचना जारी केल्या होत्या. सध्या संचारबंदी सुरु आहे. आणि येत्या १४ एप्रिलपर्यंत ही संचारबंदी लागू आहे. त्यामुळे या परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच आजारी व्यक्तींची गैरसोय होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

सचिवांनी दिलेल्या सूचनेनुसार नाशिक महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन येथील शिक्षण विभागात एक कक्ष २४ तास सुरु करण्यात आला आहे. या मदत कक्षाचा हेल्पलाईन नंबर: 0253-2222447 आणि 0253-2571289 असा आहे. ज्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग किंवा आजारी व्यक्तींना अत्यावश्यक वस्तू जसे औषध, अन्न पुरवठा किंवा इतर काही अत्यावश्यक सेवेची गरज भासल्यास वरील क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.