आता अशा पद्धतीने होणार रेमडेसिव्हिरचा पुरवठा; मेलद्वारे मागणी बंद !

नाशिक (प्रतिनिधी): रेमडेसिव्हिरचे वाटप पारदर्शी व समन्यायी पद्धतीने करणे सुलभ पद्धतीने व्हावे याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे nashikmitra.in या पोर्टलवर रेमडेसिव्हिर रजिस्ट्रेशन मध्ये रूग्णालय आस्थापनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.

अनेक रूग्णालय आस्थापनांनी सदर संकेत स्थळावर नोंदणी केलेली नाही असे निदर्शनास येते, त्यामुळे ज्या वैद्यकिय आस्थापनांनी अद्याप या संकेतस्थळावर आपल्या आस्थापनेची नोंदणी केली नसेल, त्यांनी त्वरीत नोंदणी करून दैनंदिन मागणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्राकात म्हटले आहे, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे रुग्णालयांना जिल्ह्यातील वितरकांमार्फत रेमडेसिव्हिरचे वाटप दररोज करण्यात येत असते. याकरीता रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांची संख्या व त्यातील रेमडेसिव्हिरची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या व त्याबाबतचे विहित प्रमाणपत्र रोज या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे.

यापूर्वी ही कार्यवाही ई-मेल द्वारे होत होती परंतु इमेलवर खाजगी व्यक्ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर अनावश्यक ईमेल करीत असल्यामुळे या ईमेल एड्रेस वरून रुग्णालयांची मागणी शोधणे अत्यंत वेळखाऊ झालेले असल्याने या कामासाठी पोर्टल विकसित करण्यात आले आहे.

त्याआधारे त्यामुळे रुग्णालयांना देखील माहिती नोंदवणे सोपे होणार आहे व त्याआधारे रेमडेसिव्हिरचे समन्यायी व पारदर्शकपणे वितरण करण्यात येईल.  सोमवार, १० मे २०२१ पासून वरील संकेतस्थळावरील मागणीच्या अनुषंगाने उपलब्ध साठ्याचे समन्यायी वाटप करण्यात येईल. “वरील संकेत स्थळावर मागणी अद्यावत न केल्यास व त्यामुळे रुग्णालयास इंजेक्शन वाटप न झाल्यास याची सर्व जबाबदारी संबंधित रुग्णालयाची राहील.” असेही या प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.