ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी आता तीन स्वतंत्र मदत आणि माहिती कक्ष

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात सध्या सर्वत्र वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या व त्याप्रमाणे लागणाऱ्या वैद्यकीय ऑक्सिजनची पूर्तता संबंधित रुग्णालयांना त्यांच्या गरजेप्रमाणे त्वरित व्हावी, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक व मालेगाव महानगरपालिकेसह जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी तीन स्वतंत्र मदत व माहिती कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.

नाशिक महानगरपालिका हद्दीतील संपूर्ण व्यवस्थेचे संनियंत्रण महानगरपालिकेकडून केले जाणार असून ग्रामीण भागाचे संनियंत्रण जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून केले जाणार आहे. मालेगाव महापालिका व लगतच्या परिसराचे सनियंत्रण मालेगावच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून केले जाणार आहे. प्रत्येक पुरवठादारांकडे उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून दर तीन तासांनी या कक्षास उपलब्ध होईल. मागणी व उपलब्ध साठ्याचा समन्वय साधून तो पुरविला जाईल. त्या-त्या हद्दीतील रुग्णालयांनी ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत चौकशी करण्यासाठी व त्यासंबंधीच्या इतर माहितीसाठी मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

रुग्णालयांनाच करावा लागणार पुरवठादारांशी संपर्क
जिल्ह्यातील पुरवठादाराकडे ज्याप्रमाणे टँकर प्राप्त होतील, तसे रुग्णालयांनी त्या-त्या पुरवठादारांशी संपर्क करून योग्य प्रमाणात वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा प्राप्त करून घ्यायचा आहे. त्यामुळे दिवसभरात कोणत्या पुरवठादारांकडून ऑक्सिजन उपलब्ध आहे याची माहिती रुग्णालयांना सुलभरित्या व्हावी यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे.

केंद्रिभूत पुरवठा होणार

रुग्णालयांना आणि घरात ऑक्सिजन लावलेल्यांना या हेल्पलाइनद्वारे सहजपणे ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्यात येतील. त्यासाठी ही केंद्रिभूत प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे. ती सुसूत्रीकरणासाठी निश्चित उपयोगी पडेल. – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

तीनही मदत व माहिती केंद्रांचे क्रमांक असे…
नाशिक महानगरपालिका हद्दीतील रुग्णालयांसाठी : ०२५३-२२२०८००
मालेगाव महानगरपालिका हद्दीतील रुग्णालयांसाठी : ८९५६४४३०६८ व ८९५६४४३०७०
नाशिक ग्रामीण हद्दीतील रुग्णालयांसाठी : ९४०५८६९९४०

कार्यक्षेत्रान्वये रुग्णालयांना माहिती घेत देणार ऑक्सिजन
या तीनही केंद्रांच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेला सिलिंडर्सचा साठा जाऊन घेत त्यानुसार त्या-त्या कार्यक्षेत्रातील रुग्णालयांना ऑक्सिजन देण्याचे नियंत्रण केले जाईल. परिणामी संबंधितांची होणारी धावपळ, श्रम वाचतील. यंत्रणांवरील ताणदेखील कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.