संजीव नगर भागातील कोरोना रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणार; मनपा आयुक्तांकडून सूचना

नाशिक: शहर व परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने संजीवनगर या भागातील प्रतिबंधित क्षेत्राची नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पाहणी केली तसेच त्या परिसरातील  पाहणीनंतर विविध कामांच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. नाशिक शहर व परिसरात कोरोना कोविड-१९ चा प्रादुर्भाव  रोखण्याच्या दृष्टीने नाशिक महानगर पालिका प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असताना शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात शासन निर्देशानुसार उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पाहणी केली.

सातपूर अंबड लिंकरोड परिसरातील संजीव नगर येथील  प्रतिबंधित क्षेत्रात  आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भेट देऊन तेथील कार्यवाही बाबतचा सविस्तर आढावा घेतला. तसेच मनपाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस विभाग यांना प्रतिबंधित क्षेत्राची खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी दिल्या. या परीसरात मिळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (सहवासीत) करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच किती व्यक्ती संपर्कात आले याचा शोध घेण्याचे देखील संबंधितांना सूचना देण्यात आल्या. तसेच हा रुग्ण ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हा रुग्ण भरती झाला होता. ते हॉस्पिटल महापालिकेने सील करून हे हॉस्पिटल कवारंटाइन सेंटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी  ज्युपिटर हॉस्पिटलची यावेळी पाहणी केली तसेच तेथे कार्यरत डॉक्टर तसेच इतर कर्मचारी असे एकूण  १४ जणांना कॉरंनटाईन करण्यात आले असून त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या १४ व्यक्तींची जेवणाची व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आल्या असून प्रतिबंधित क्षेत्रात साफसफाई तसेच औषध फवारणी याबाबतची सविस्तर माहिती घेण्यात आली.

याठिकाणी नेमण्यात आलेले वैद्यकीय पथक घरोघरी जाऊन कुटुंबांची माहिती घेऊन तसेच तपासणी करत असून याची खातरजमा  आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली. तसेच कोरोनाशी संबंधित रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्याची माहिती त्वरित मनपा वैद्यकीय विभागात देणे बंधनकारक आहे. न दिल्यास संबंधित हॉस्पिटल वर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला आहे.

तसेच प्रतिबंधित क्षेत्रात समन्वय राहण्याच्या दृष्टीने एक स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात यावा त्या कर्मचार्‍याचा भ्रमणध्वनी प्रतिबंधित क्षेत्रात ज्याठिकाणी बॅरिकेटिंग लावले आहे त्या ठिकाणी तसेच प्रवेशद्वार परिसरात फलक लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.