खाजगी रुग्णालयांना अखंड ऑक्सिजन पुरवठ्यासाठी नियोजन : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

नाशिक (प्रतिनिधी): सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोविडचे उपचार करणारे खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा होणारा वापर लक्षात घेता, खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा अखंडितपणे पुरवठा होण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तथा ऑक्सिजन पुरवठा सनियंत्रण अधिकारी डॉ. किशोर वास यांना घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

आदेशात नमूद केल्यानुसार खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांना ऑक्सिजन बेडची उपलब्धता व तेथील ऑक्सिजनचा वापर लक्षात घेता, कोविड उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयात संबंधित यंत्रणेने ऑक्सिजनचा पुरेसा साठा तत्काळ उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे संबंधित रुग्णालयांनी जम्बो सिलेंडरचे रूपांतर ड्युरा सिलेंडरमध्ये करण्यासाठी उपाययोजना करणे या बाबींवर डॉ वास यांचे दैनंदिन नियंत्रण राहील.

त्याचप्रमाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरित अतिरिक्त 50 ड्युरा सिलेंडर उपलब्ध होण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी आदेशात नमूद केले आहे.

ऑक्सिजन पुरवठा सनियंत्रण अधिकारी म्हणून डॉ. वास यांनी दररोज किमान एका रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे किंवा कसे, नियमानुसार ऑक्सिजनचा वापर, ऑक्सिजन संबंधी हाताळणी करणारे तज्ञ व्यक्ती याबाबतची तपासणी करायची असून  केलेल्या कार्यवाही दरम्यान काही त्रुटी आढळून आल्यास 24 तासांमध्ये त्यांचे निराकरण करून रुग्णालयांना अखंडीत ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी  मांढरे यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचा वापर करण्याच्या दृष्टीने सर्व खाजगी रुग्णालयांनी आपली साठवणुकीची क्षमता वाढवावी असे आवाहनही  मांढरे यांनी केले आहे.