नागरिकांनी सहकार्य न केल्यास 2 एप्रिल रोजी लॉकडाऊनचा निर्णय !

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता साधारणतः एक आठवडा निर्बंध यांची सक्त अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार असून या परिस्थितीत  नागरिकांनी सहकार्य न केल्यास 2 एप्रिल रोजी लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात नाशिक जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ.प्रशांत खैरे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा:  नाशिक: अवैध सावकार देवरेकडे कोट्यवधींची माया; एसआयटी पथक करणार तपास !

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांसोबत दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला असून मागील वर्षापेक्षा बिकट परिस्थितीकडे वाटचाल सुरू आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. यासाठी पोलिसांनी निर्बंधांचे अंमलबजावणीमध्ये सक्रिय रित्या सहभागी होणे अत्यंत आवश्यक झालेले आहे, अशा सूचना पालकमंत्री  भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

खाजगी डॉक्टर्स व लॅब यांनी महानगरपालिका व पोलिस यंत्रणांना गृहविलगीकरणातील रूग्णांची दैनंदिन माहिती कळविल्यास गृहविलगीकरणाचे नियम न पाळणाऱ्या रुग्णांवर महानगरपालिका व पोलिस यंत्रणेने एकत्रितपणे कारवाई करावी. तसेच खाजगी डॉक्टर्सनी गृहविलगीकरणातील रुग्णांना आवश्यक त्या सुविधा आहेत किंवा कसे याबाबत देखील तपासणी करण्याची जबाबदारी पार पाडावी. त्याचप्रमाणे गृहसोसायटीच्या चेअरमन यांनी देखील आपल्या सोसायटीत गृहविलगीकरणात असलेल्या व कोरोनाबाधित रुग्णांची माहिती प्रशासनाला कळविण्यात यावी, असे आवाहन देखील पालकमंत्री  भुजबळ यांनी केले आहे.

वाढती रुग्णसंख्या पाहता कोविड केअर सेंटर्ससाठी हॉटेल्स अधिग्रहित करण्यात यावेत. तसेच ९५ ते ११० मेट्रिक टन ऑक्सिजनची दररोज निर्मीती करण्यात येत असल्याने जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे. त्यामुळे शासकीय आणि खाजगी रुग्णालयांना पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. तसेच ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळे आणणाऱ्या एजन्सीवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही पालकमंत्री  भुजबळ यांनी दिले आहेत.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४०.७ अंश तापमान !

जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सादरीकरणाद्वारे माहिती देतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, गेल्यावर्षातील रुग्णांची संख्या व येत्या महिनाभरात वाढलेल्या रुग्णांची संख्या यातील तुलनात्मक तक्ता जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्र्यासमोर सादर केला. आजच्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये साधारण 70 ते 80 टक्के रुग्ण हे शहरी भागात आहेत. याअनुषंगाने तपासणीचे प्रमाण वाढविण्यासाठी पाच हजार क्षमतेच्या दोन प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात येत आहेत, प्रतिबंधित क्षेत्रालगतच्या परिसरात प्रसार रोखण्याच्या दृ्ष्टिने केलेल्या नियोजनानुसार  सर्व यंत्रणांनी प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी  मांढरे यांनी सांगितले.

हे ही वाचा:  नाशिक: कॉलेजरोडवर बंगल्यात शिरून वृद्धावर चाकू हल्ला; पावणेपाच लाखांचा ऐवज लुटून चौघे फरार

त्याचप्रमाणे जिल्ह्यात साधारण तीन लाख लसीकरणाचे डोस प्राप्त झाले असून त्यापैकी दोन लाखांपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात 151 लसीकरण केंद्र सुरू असून 26 लसीकरण केंद्र नव्याने सुरू करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी  मांढरे यांनी पालकमंत्री यांना बैठकीत सादर केली.

या बैठकीमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी संक्रमण क्षेत्रांमध्ये लागू करण्यात आलेल्या निर्बंधाची अतिशय कठोर काटेकोर अंमलबजावणी कनिष्ठ कर्मचारी यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या मार्फत प्रभावीपणे करून घेण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री यांना दिले.

शहरांमधील हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असलेल्या बेडची माहिती नागरिकांपर्यंत हेल्पलाईन द्वारे तसेच ऑनलाइन पोर्टलद्वारे वेळोवेळी पोहोचवण्यात येईल. तसेच लवकरच किमान एक हजार बेडने हॉस्पिटल क्षमता वाढवण्यात येईल, असे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790