लोकांच्या विरोधानंतरही लॉकडाऊन लावणार का ? राजेश टोपेंची महत्वपूर्ण प्रतिक्रिया

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारची भूमिका मांडत लॉकडाऊनबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

लॉकडाऊनबाबत सध्या राज्यात संभ्रम आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या नियोजनाचे निर्देश दिलेले असतांनाच दुसरीकडे त्याला विरोधही होत आहे.

आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीनेही लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. अशातच मोठमोठे उद्योगपतीसुद्धा लॉकडाऊनच्या विरोधात आहेत. भाजपनेतर लॉकडाऊन खपवून घेणार नाही असा इशाराच दिला आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा म्हणून राज्य सरकारचा लॉकडाऊन लावण्याचा विचार आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिक, लघुउद्योजक यांना बसणार आहे.

संभाव्य लॉकडाऊनवरून राज्य सरकारवर सध्या टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारची भूमिका मांडत लॉकडाऊनबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

‘लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, याची चिंता राज्य सरकारला आहे. ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सगळं राज्य सरकार करत आहे. संसाधनांची कमी पडू दिली जात नाही. कोरोना संख्येच्या वाढत्या गतीपुढे आपली संसाधनं कमी पडतील अशी मला शंका वाटते आहे. लॉकडाऊनची कोणालाही हौस नाही. पण आपली संसाधनं जर वाढत्या रुग्णांच्या पुढे कमी पडत असतील तर लॉकडाऊन करावा लागतो,’ अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे.

‘सर्वांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येईल. कोरोनासाठी सध्या निधीची कोणतीही अडचण नाही. अनेकजण कोरोना बाधित स्वत:ची काळजी घेत नाहीत आणि इतरांनाही बाधित करत आहेत. ही चिंतेची बाब आहे. कोरोनाचे काहीही लक्षण दिसली तर तातडीने चाचणी करा आणि उपचार सुरु केले पाहिजेत. जास्तीत लोकांनी लसीकरण केलं पाहिजे. सगळ्या सामाजिक आणि राजकीय संस्थांनी 1 एप्रिलपासून 45 पेक्षा ज्यांचे वय जास्त आहे अशांचे निवडणुकीप्रमाणे लसीकरण केलं पाहिजे. यामुळे हर्ड इम्युनिटी तयार होईल,’ असंही राजेश टोपे यावेळी म्हणाले.

लोकांच्या बिनधास्तपणामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आम्ही दुप्पट गतीने राज्यात लसीकरण करणार आहोत, अशी घोषणा राजेश टोपे यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यात लॉकडाऊनच्या दृष्टीने तयारीला लागा, अशा सूचना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेनंतर भाजप आणि मनसेनं सरकारवर जोरदार निशाणा साधला. गरीब आणि सर्वसामान्य लोकांना आता लॉकडाऊन परवडणार नाही, असं म्हणत या दोन्ही पक्षांनी लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली.