नाशिक: १५ ते १८ वयोगटातील मुलांना उद्या (दि. ३ जानेवारी) या ६ केंद्रांवर मिळणार लस
नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तसेच ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने लसीकरणाला वेग दिला आहे.
आता केंद्र शासनाच्या सूचनेनुसार येत्या सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरू केली जाणार आहे.
शहरातील सहा केंद्रांवर लस दिली जाणार असून प्रत्येक केंद्रावर साधारण तीनशे डोस असतील.
गेल्या वर्षी १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत महापालिका क्षेत्रामध्ये १८ वर्षे वयोगटातील व्यक्तींना लस दिली जात आहे. नाशिक शहरात पहिला डोस झालेल्या नागरिकांची संख्या १२ लाख ५६ हजार ६०० (९२ टक्के) इतकी आहे, तर दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांची संख्या ८ लाख ७७ हजार ८९३ (६३ टक्के) इतकी झाली आहे. आता, महापालिका हद्दीतील १५ ते १८ वयोगटातील तब्बल एक लाख किशोरवयीन मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9576,9566,9562″]
शासनाच्या निर्देशांनुसार मुलांना ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे डोस दिले जाणार आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे. सहा केंद्रांवर प्रत्येकी ३०० डोस उपलब्ध करून दिले जाणार असून प्रत्येकी १०० डोस ऑनलाईन नोंदणी केलेल्यांसाठी राखीव असणार आहेत.
या ठिकाणी मिळणार लस: मेरी कोविड सेन्टर (पंचवटी), समाज कल्याण (नाशिक पुणे रोड), सिडको श प्राथामिक आरोग्य केंद्र, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, ESIS हॉस्पिटल (सातपूर), न्यू बिटको ,नाशिकरोड या सहा ठिकाणी मुलांसाठी लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शाळा, महाविद्यालयांमधील लसीकरणासाठी बैठक:
शहरातील सहा केंद्रांवर लसीकरण होणार असले तरी या मोहिमेला गती देण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची देखील मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून शाळा व्यवस्थापनाची नियोजनासाठी मदत घेतली जाणार आहे. शाळा, महाविद्यालय स्तरावर लसीकरण केंद्रांची यादी लवकरच जारी केली जाणार असल्याचे वैद्यकीय विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.