७० बेपत्ता महिलांचा शोध; उत्कृष्ट कामगिरीबद्दल महिला पोलिसांचा सत्कार !

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ अंतर्गत ७ पोलिसठाण्यातील महिलांवरील अत्याचार, विनयभंग, बेपत्ता, टवाळखोरी, छेडछाड तर, कौटुंबिक वाद इत्यादी. प्रलंबित  गुन्ह्यांच्या तपासात महिला पोलिसांनी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त दिपक पांडे यांच्या हस्ते महिला पोलिस कर्मचारी तथा अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

पोलिस आयुक्त दिपक पांडे व उप आयुक्त तांबे यांच्या सूचनेनुसार, १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान, विशेष मोहीम हातात घेण्यात आली. यामध्ये पंचवटी, आडगाव, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर, मुंबईनाका, म्हसरूळ या ७ पोलिसठाण्यांची दर आठवड्याला बैठक घेण्यात येऊन, मार्गदर्शन केले गेले. दरम्यान, या मोहिमेतून प्रलंबित गुन्हे व प्रकरणांचे तपास करण्यात आले.

यामध्ये विनयभंग, कौटुंबिक अत्याचार, बेपत्ता असे एकूण ७४ गुन्हे उघडकीस आणले. तर, महिला अत्याचाराच्या गुन्ह्यातील २९ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, मिसिंग असलेल्या ७० महिलांचा शोध घेऊन त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन केले. अशी उत्कृष्ट कामगिरी अवघ्या ३१ दिवसांमध्ये पार पाडण्यात आली. तर, पोलिस हवालदार मंगला जगताप यांनी १७ दिवसांमध्ये गुन्ह्याचा तपास लावल्याने त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच निर्भया पथक मधील चांदणी पाटील, अनिता पाटील, सरला घोलप, ललिता वाघ, जयश्री राठोड, जयश्री कांगणे, शुभांगी आवारे, रिना आहेर, वनिता पैठणकर, सोनाली वडारकर, यांनी टवाळखोरांवर कारवाई करून महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना रुजवली. यामुळे यांना प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.