नाशिक: विनाहेल्मेट पेट्रोल देण्यास नकार; कर्मचार्‍यास बेदम मारहाण

विनाहेल्मेट पेट्रोल देण्यास नकार; कर्मचार्‍यास बेदम मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी शहरात ‘नो हेल्मेट – नो पेट्रोल’ हे धोरण लागू केले. पोलिसांच्या धास्तीने पंपचालकही विना हेल्मेट पेट्रोल देण्यास नकार देतात. मग नाशिककरांनी पेट्रोल मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवायला सुरुवात केल्याचे दिसून येते.

शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीला पेट्रोल भरण्यापुरते हेल्मेट मागितले जाते. पण हेल्मेट हे फक्त पेट्रोल भरण्यासाठी नाही तर स्वतःच्या सुरक्षेसाठी वापरायचे आहे. हेल्मेट न घातल्याने अपघातात आपला प्राण गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. तर आता पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गेलेल्या वाहनधारकाने पंपावरील कर्मचार्‍यास लाथाबुक्क्यांनी मा’र’हाण केल्याचीही घटना घडली. म्हसरूळ येथील पेट्रोल पंपावर ही घटना घडली.

म्हसरूळ येथील दिंडोरी रोड परिसरात असलेल्या इच्छामणी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणांकडे हेल्मेट नसल्याने येथे पेट्रोल भरणारा कर्मचारी ज्ञानेश्वर पोपट गायकवाड (वय २४) याने पेट्रोल दिले नाही, म्हणून पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणांनी या कर्मचार्‍याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून तसेच दगड मारून प्रचंड दुखापत केल्याने सदर तरुण गंभीर जखमी झाला आहे, सदर घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. अशीच एक घटना खुटवडनगर येथे घडल्याचे समोर आले आहे. पेट्रोल पंपावर विनाहेल्मेट वाहन चालकाकडून पोलिसांशी हुज्जत घालण्याचा तसेच पोलिसावर हात उचलल्याचा प्रकार घडला असून संबंधितास पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.