लग्न समारंभातून चोरट्याने लांबविले २ लाखांचे दागिने व रक्कम !

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील गंगापूर रोड परिसरातील बालाजी लॉन्स येथे एक लग्न समारंभ पार पडत होता. दरम्यान, एका अज्ञात चोरट्याने पर्समधील २ लाख ६६ हजाराचे काही दागिने व रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगिनी श्रीराम कातकाडे (वय ५२) या प्लॉट क्रमांक ४२ रामयोग सप्तशृंगी कॉलनी, कुसुमाग्रज प्रतिष्ठान जवळ गंगापूर रोड येथे राहतात. तसेच गुरुवारी (दि.२४ डिसेंबर) रोजी फिर्यादी यांच्या मुलाचा विवाह सोहळा बालाजी लॉन्स गंगापूर रोड येथे ठेवण्यात आला होता. दरम्यान, फिर्यादी लग्न सोहळ्यात सभामंडपातील स्टेजवर बसल्या असून, त्यांच्या जवळच स्वतःची गुलाबी रंगाची पर्स ठेवलेली होती. या पर्समध्ये सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम ठेवलेली होती.

दरम्यान, कोणी तरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी व इतर लोकांचे लक्ष नसतांना ही पर्स चोरून पोबारा केला. पर्समध्ये ५० हजार किंमतीचा एक सोन्याचा नक्षीदार नेकलेस, ५० हजार किंमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, ५ हजारांचे कानातले, ८ हजारांचे ४ कानातल्यांचे जोड, १० हजार किंमतीचे एक नथ व सोन्याच्या ४ अंगठ्या, ३ हजारांचा चांदीचा छल्ला व पायातील जोडवे व १ लाख ४० हजार रोख रक्कम इत्यादी असा एकूण २ लाख ६६ हजारांचा ऐवज होता.