यंदा नवरात्रोत्सव काळात सप्तश्रृंगी देवीचे दर्शन ऑनलाइन होण्याची शक्यता

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विश्वस्त मंडळासोबत झालेल्या बैठकीत निर्णय..!

नाशिक (प्रतिनिधी): कोरोना या जागतिक महामारीमुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासन अहोरात्र प्रयत्न करून या महामारीचा सामना करत आहे. येत्या १७ तारखेपासून नवरात्रोत्सव सुरू होत असून राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आधारे यंदा हा उत्सव आपण साजरा करू शकत नाही; मात्र भाविकांची श्रद्धा लक्षात घेता विश्वस्त मंडळाने सोशल मीडिया, दूरचित्रवाणीद्वारे  देवीचे दर्शन ऑनलाईन सुरू करण्याबाबत उपाययोजना कराव्यात असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

ते आज मौजे सप्तश्रृंगी गड येथे झालेल्या राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे या वर्षीचा नवरात्रोत्सव कसा असावा याबाबत नियोजन बैठकित अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथीचे आजार नियंत्रण कायद्यातील तरतुदी लक्षात घेता यावर्षीची नवरात्रोत्सव यात्रा रद्द करण्यात येत आहे. या काळात सप्तश्रृंगी देवीचे मंदिर पूर्णतः बंद असेल तसेच विश्वस्त संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सेवा भाविकांसाठी उपलब्ध नसतील. ज्योत, कावड घेऊन येणाऱ्या भाविकांसह होणारे धार्मिक उपक्रम विश्वस्त संस्थेच्या वतीने उपलब्ध होणार नाही. विश्वस्त संस्था आणि स्थानिकांनी चैत्रोत्सव साजरा करताना केंद्र आणि राज्य शासनाच्या निकषांचे तंतोतंत पालन करत प्रशासनास योग्य सहकार्य केले होते; त्याच धर्तीवर नवरात्रोत्सव दरम्यान भगवती मंदिरात घटस्थापना, पंचामृत महापुजा, दैनंदिन आरतीपुजा, शांती पाठ, अलंकार यांचे पुजन पुजारी आणि कर्मचारी वर्गामार्फत करताना कोव्हीड १९ च्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी नमूद केले.

भाविकांच्या धार्मिक भावनांचा विचार लक्षात घेता विश्वस्त संस्थेने ऑनलाईन दर्शनाची सुविधा विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच दूरचित्रवाणीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना कराव्यात. तसेच यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नवरात्र उत्सव रद्द झाल्याबाबत भाविकांचे प्रबोधन करावे. या कालावधीत गडाकडे जाणारे वाहन रस्ते व इतर तीन पर्यायी पायी मार्ग बंद करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी चर्चेत सहभागी होताना पोलीस अधीक्षक सचिन पाटील म्हणाले, पोलीस प्रशासनातर्फे जिल्ह्यातील सर्व रस्ते व मार्गावर कावड धारक आणि ज्योत वाहक या भाविक वर्गाला प्रबोधन करून गडावर न जाण्यासाठी आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगितले.