नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील मखमलाबाद येथील माळी वस्तीत एका फार्महाऊसमध्ये तलवारी, चॉपर व फायटर ही प्राणघातक शस्त्रे आढळून आली. याप्रकरणी प्रणील पठाडे याला बेकायदेशीरपणे प्राणघातक शस्त्रे स्वतःजवळ बाळगल्यामुळे गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने कारवाई करत शस्त्रे जप्त केली आहेत.
गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने, मखमलाबाद येथे माळी वस्तीत राहणाऱ्या प्रणील प्रकाश पठाडे (वय 32) याच्या फार्महाऊसमध्ये प्राणघातक शस्त्रे आहेत, अशी माहिती मिळाली. दरम्यान अचानक शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास पोलिसांकडून धाड टाकण्यात आली. यावेळी फार्महाऊसमध्ये ८ तलवारी, २ चॉपर, १ फायटर हा शस्त्रसाठा आढळून आला. यामुळे शस्त्रबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रणील पठाडे यास अटक झाली असून, शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.