प्रवासी म्हणून बसले आणि कॅब चालकास धमकावून गाडीच पळवून नेली

नाशिक (प्रतिनिधी) : ४ अनोळखी इसमांनी सिन्नरला जाण्यासाठी ओला कंपनीची गाडी बुक केली. मात्र, सिन्नरला न जात ओला गाडी चालकाला शिर्डी येथे घेऊन गेले. दरम्यान चालकाला जीवे मारण्याची धमकी देत, चालकाजवळील जिओ व सॅमसंगचा कंपनीचा फोन आणि महिंद्रा वेरीटो गाडी घेऊन पोबारा केला.

सदर गुन्ह्याची तक्रार पंचवटी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यातदार राहुल प्रदीप फेगडे (वय,२८ रा.उत्तमनगर सिडको, नाशिक) हे ओला कंपनीचे वाहन चालक आहेत. मंगळवारी (दि.२४ नोव्हेंबर) रोजी ४ अज्ञात इसमांनी सिन्नरला जाण्यासाठी ओला गाडी बुक केली. मात्र, सिन्नरला न जाता या इसमांनी गाडी शिर्डी येथे नेण्यास सांगितली. दरम्यान फेगडे यांचे हातपाय बांधून, ३० हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादीजवळील एटीएम कार्ड, जिओ व सॅमसंग कंपनीचा फोन हिसकावून घेतला. तसेच राज नागराज पाटील (रा.उत्तमनगर, नाशिक) यांच्या मालकीची महिंद्रा वेरिटो (एमएच १५ ई ७८३७) या गाडीतून फेगडे  यांना जबरदस्तीने उतरवून देऊन, इसमांनी पोबारा केला.