पंचवटी परिसरातील दंत साहित्य विक्रीच्या दुकानाला आग !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील पंचवटी परिसरातील टकलेनगर भागात असलेल्या व्यावसायिक संकुलातील तळमजल्यावरील दंत दवाखान्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दुकानाला रात्री आग लागली. दरम्यान, आग विझवण्यासाठी पंचवटी व कोणार्कनगर भागातील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

मुंबई आग्रा महामार्गावरील व्यापारी संकुलात असलेले हे खुश डेन्ट डेंटल सिस्टीम नावाचे दुकान, या दुकानात दाताच्या दवाखान्यासाठी लागणाऱ्या साहित्याची विक्री केली जात होती. मात्र, (दि.११ जानेवारी ) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक या दुकानाला भीषण आग लागली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी याची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर पंचवटी व कोणार्कनगर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन, अवघ्या तासाभरातच आग आटोक्यात आणली.

आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजले नाही. तर, या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या आगीमुळे जीवितहानी झाली नाही.