तलाठी भरती गैरप्रकारामुळे नाशिक जिह्ल्यातील तलाठ्यांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक (प्रतिनिधी) : नगर जिह्ल्यातील तलाठी भरती प्रक्रियेवेळी प्रवेश अर्जात, परीक्षागृहातील स्वाक्षरी, व छायाचित्रातील तफावत या कारणांमुळे नगर जिल्ह्यातील तलाठी भरती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यामुळे मागील महिन्यात नाशिक जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या तलाठी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

महापरीक्षा पोर्टल अंतर्गत राज्यात तलाठी भरती करण्यात आली, मात्र, या प्रक्रियेत काही ठिकाणी डमी विध्यार्थी बसवण्यात आल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात असा प्रकार उघडकीस आल्यामुळे नवनियुक्त तलाठ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यात ८३ पदांसाठी तलाठी भरती घेण्यात आली होती. यामध्ये अनुसूचित क्षेत्राबाहेरील ६१ तर पैसे क्षेत्रातील २२ पदांचा समावेश आहे. उमेदवारांची जास्त संख्या पाहता जिल्ह्यातील परीक्षा महिनाभर सुरु होती.

दरम्यान प्रश्नपत्रिका तसेच परीक्षा कक्षातील प्रवेशावरून देखील अनेक वाद चर्चेत होते. जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या ६७ जणांची भरती प्रक्रिया मागील वर्षी सुरु करण्यात आली होती. सदर नियुक्त तलाठ्यांचे प्रशिक्षण देखील पूर्ण झाले आहे. मात्र, नगर जिल्ह्यातील या परीक्षेचे सीसीटीव्ही फुटेज अचानक गायब झाल्याने गोंधळ निर्माण होऊन थेट परीक्षेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. यामुळे अधिक तपासणी होणार असल्याच्या चर्चां होत आहेत.