तपोवन परिसरात महाविद्यालयीन युवकांची लूटमार करणारे दोघे अटकेत

नाशिक (प्रतिनिधी): तपोवन परिसरात निर्जनस्थळी महाविद्यालयीन युवकांना लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. संशयित दीपक दिगंबर गायकवाड (२२, रा. गोरेवाडी, जेलरोड), अनिकेत राजू रोकडे (१९, रा. कॅनॉलरोड, जेलरोड) या दोघांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने ही कारवाई केली.

तपोवन भागात कोयत्याचा धाक दाखवून महाविद्यालयीन तरुणांना लुटण्याचे प्रकार घडत होते. या संशयितांच्या मागावर पथक होते. अशाचप्रकारे तपोवन भागातील महापालिकेच्या जलकेंद्र येथे निर्मनुष्य स्थळी लूटमार झाली होती. संशयित हे जेलरोड परिसरात रहात असल्याची माहिती मिळाली. या आधारे गुन्हे शोधपथकाचे सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, भास्कर वाढवणे, जगदीश जाधव, विजय सूर्यवंशी, दशरथ पागी, विश्वास साबळे, योगेश कदम, सचिन बाहीकर, वैभव परदेशी यांनी तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने तपास करत दोघांस अटक केली तर एकास ताब्यात घेतले. संशयितांची सखोल चौकशी केली असता लूट केल्याची कबुली दिली. या संशयितांकडून दोन मोबाइल, एक कोयता, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. संशयितांनी अशाचप्रकारे अनेकांची लूट केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे