डिस्काउंट दिला नाही म्हणून हॉटेलचालकास मारहाण

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील नाशिक-पुणे हायवे जवळ शिंदेगाव येथे असलेल्या हॉटेल स्फूर्तीच्या मालकास २ ग्राहकांनी संगनमत करून, मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी तुषार बाळासाहेब ढिकले (वय २८) हे परम हाईट्स, प्लॉट क्रमांक ९, जत्रा हॉटेल जवळ, कोणार्क नगर परिसरात राहतात. फिर्यादी यांची हॉटेल असून, मंगळवारी (दि.५ जानेवारी) रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ढिकले हॉटेलचे गेट बंद करत होते. दरम्यान, संशयित आरोपी अंकुश गायखे व सागर चौधरी हे दोन्ही नाशिकचे रहिवाशी असून, फिर्यादी यांना ‘आम्हाला डिस्काउंट का नाही दिले’ असे बोलून, भांडण करू लागले. तसेच शिवीगाळ व धक्काबुक्की ही करू लागले. दोघांपैकी एकाकडे लोखंडी पाईप होता, यामुळे फिर्यादी घाबरून पळू लागला. मात्र, संशयिताने हातातील लोखंडी पाईप फिर्यादीच्या डोक्यावर व पाठीवर मारला. तर दगडाने देखील मारहाण केली यामध्ये फिर्यादीच्या बोटातील सोन्याची अंगठी हरवली.