जिल्ह्यातील परमीट रूम, हॉटेल्स आणि आस्थापनांची वेळ निश्चित

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील परमीट रूम, हॉटेल्स आणि आस्थापनांची वेळ निश्चित करण्यात आलेली असून वेळेबाबत नियम न पाळल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी निर्गमित केले आहे.
जिल्हाधिकारी मांढरे यांनी निर्गमित केलेल्या शासकीय आदेशानुसार, राज्यात मिशन बिगीन अगेन बाबत अधिसूचना जाहिर करण्यात आलेली असून त्यानुसार नाशिक जिल्ह्यात 5 ऑक्टोबर पासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यात परमीट रूमसाठी सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत, मद्याविक्रीसाठी नसलेले हॉटेल्स यांची वेळ सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत तर अन्य आस्थापनांची वेळ सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार असल्याचे नमूद केले आहे.

संबंधित वेळेबाबत असलेल्या नियमांचा भंग करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग कायदा 1897 तसेच या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमांन्वये कायदेशीर कारवाई होणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी आदेशद्वारे म्हटले आहे.