जिल्हास्तरावरील यशानंतर आता ‘व्हाट्सॲप ग्रिव्हन्स रिड्रेसल’ कक्ष प्रत्येक उपविभागात

नागरिकांना आपल्या शासकीय कामकाजाच्या सद्यस्थितीची माहिती मिळणार मोबाईलच्या एका क्लिकवर

नाशिक (प्रतिनिधी): नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सगळेच प्रशासकीय विभाग आपापल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. बहुसंख्य कामे ऑनलाइन करण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांना आता आपल्या शासकीय कामकाजाचे दस्तावेज, विविध अर्ज कुठल्या स्तरावर आहेत, याबाबतची माहिती अगदी घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी जिह्यातील सर्व प्रांत कार्यालयात ‘व्हाट्सॲप ग्रिव्हन्स रिड्रेसल’ कक्ष  कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. अर्जदार आता व्हाट्सॲपद्वारे या कक्षाशी संपर्क साधू शकतात, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

गेले सहा महिन्याहून अधिक काळ ही सुविधा जिल्हास्तरावर सुरू आहे. त्याचा लाभ आतापर्यंत 15 हून अधिक नागरिकांनी घेतलेला आहे वबंधन सर्व खातेप्रमुख आणि कसोशीने पाळले आहे. त्यामुळे ही सुविधा केवळ जिल्हास्तरावर मर्यादित न ठेवता आता उपविभाग स्तरावर देखील उपलब्ध करून देण्याचा निर्णय महसूल अधिकारी बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे यांनी घेतला.

जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय कार्यालयात पुढील प्रमाणे व्हॉटस्अप नंबर कार्यान्वित करण्यात आले आहे.

उपविभागीय अधिकारी नाशिक 9421550799, उपविभागीय अधिकारी कळवण 9421550812, उपविभागीय अधिकारी दिडोरी 9421550822, उपविभागीय अधिकारी इगतपुरी 9421550852, उपविभागीय अधिकारी बागलाण 9421550893, उपविभागीय अधिकारी येवला 9421550907, उपविभागीय अधिकारी मालेगाव 9421550927, उपविभागीय अधिकारी निफाड 9421550937, उपविभागीय अधिकारी चांदवड 9421550947. यानुसार कार्यालयनिहाय दिलेल्या मोबाईल व्हॉटसॲप क्रमांकावर सर्वसामान्य नागरिकांनी कार्यालयात न जाता  त्यांच्या व्यक्तिगत शासकिय कामकाजाच्या पाठपुरावा करण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी केले आहे.

असा करावा व्हॉटसॲपवर अर्ज:
नागरिकांनी त्यांचे नांव , पत्ता व संपर्क क्रमांक लिहून त्याखाली ज्या कार्यालयात मुळ अर्ज केलेला आहे . त्या कार्यालयाचे नांव , अर्जाचा विषय , अर्जाचा दिनांक हा तपशिल नमूद करावा व त्यासोबत मुळ अर्जाचा स्वच्छ व वाचनीय फोटो असे एकत्रितपणे तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयांत न येता संबंधित कार्यालयाच्या व्हॉटसॲप क्रमांकावर पाठवावे,असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.