ओझर येथे वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

नाशिक (प्रतिनिधी) : ओझर येथे एचएएल समोर असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. महामार्ग ओलांडत असतांना बिबट्याच्या तोंडाला वाहनाची जबर धडक बसल्याने तो जागीच ठार झाला.

एचएएल कंपनीमधील सबस्टेशन १३२ केव्ही मधून येऊन बिबट्या महामार्ग ओलांडून जात होता. दरम्यान, एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली असता त्याच्या तोंडाला मार बसून गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत बळी पडलेला बिबट्या १ वर्ष वय असलेली मादी होती. अशी माहिती चांदवड वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार यांनी दिली. या घटनेचा पंचनामा करून मृत बिबट्याला उत्तरीय तपासणीसाठी चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालय येथे नेण्यात आले.