नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी झालेली ऑक्सिजन गळती आणि त्यामुळे २२ रुग्ण दगावल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक साजन सोनवणे यांनी याबाबत एफआयआर दिली आहे.
या ऑक्सिजन गळतीस हलगर्जीपणा कारणीभूत असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे FIR मध्ये म्हटले आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हलगर्जीपणा करत इतरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी भारतीय दंड विधान ३०४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटना प्रकरणी राज्य सरकारने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून त्याचा अहवाल सादर करण्यात आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये या गुन्हाची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.