नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गोदावरी नदीला पुर आला आहे. यामुळे रामतीर्थांवर होणारे धार्मिकविधी नीलकंठेश्वर मंदिराजवळ होत असताना त्याठिकाणी धार्मिक विधी केल्यानंतर पुराचे पाणी पाहताना तोल जाऊन पुराच्या पाण्यात पडताच, तरुण अभियंता दिसेनासा झाला. कुटूंबियांच्या डोळ्यादेखत ही घटना घडली. जीवरक्षकांसह अग्निशमन दलाच्या पथकाने पुराच्या पाण्यात तरुणाचा शोध सुरू केला मात्र, सायंकाळपर्यंत तो हाती लागला नव्हता.
यग्नेश पवार (२९, रा. ओझर, ता. निफाड) असे गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुण अभियंत्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यग्नेश पवार हा भुसावळ येथे महावितरण वीज कंपनीत अभियंता असून, मूळचा ओझर येथील आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून नाशिक आणि धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरणसाठ्यात वाढ झाली असून, धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. परिणामी, गोदावरी नदीला पुर आला आहे. यामुळे गोदाघाटावरील रामतीर्थ येथे होणारे धार्मिक विधी हे काठावरील मंदिरांमध्ये सुरू होते.
पवार कुटूंबियदेखील कालसर्प योगाची पूजाविधी व देवदर्शनासाठी आले होते. दुपारी गोदावरीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत होती. नीलकंठेश्वर मंदिराजवळ पवार कुटूंबियांची पूजाविधी आटोपल्यानंतर यग्नेश पवार हे पुराच्या पाण्याजवळ डोकावून पाहत असतानाच त्याचा तोल गेला आणि तो नदीपात्रात कोसळला. तो कोसळताच काही क्षणात दिसेनासाही झाला.
ही घटना पवार कुटूंबियांच्या डोळ्यादेखत घडल्याने कुटूंबियांनी एकच टाहो फोडला. जीवरक्षकांनी पुराच्या पाण्यात उड्या घेतला परंतु यग्नेश त्यांच्या हाती लागला नाही. घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरू होते.