नाशिक: त्र्यंबकला आजपासून व्हीआयपी दर्शन बंद; मात्र ‘या’ पाहुण्यांना मिळणार एन्ट्री

नाशिक (प्रतिनिधी): शासकीय सुट्या आणि त्यानंतर श्रावण पर्वकाळासाठी होणारी गर्दी पाहता आजपासून (दि. १२) ते १५ सप्टेंबरपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. मात्र, केंद्रीय आणि राज्यस्तरावरील राजशिष्टाचार म्हणून येणाऱ्या व्हीआयपींना दर्शन दिले जाणार आहे.

देवस्थानच्या अध्यक्षांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना व्हीआयपी दर्शन बंद करण्याबाबतचे पत्र दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी अथवा तोंडी आदेशाने व्हीआयपी दर्शनाची सुविधा देण्यासाठी त्र्यंबकेश्वर तहसीलदार श्वेता संचेती आणि मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचके यांची नेमणूक करीत असल्याचे आणि त्यांच्यामार्फत येणाऱ्यांना व्हीआयपी दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचे पत्र देवस्थानला दिले आहे.

सर्वसामान्य भाविक हजारो रुपये खर्च करून, वेळ देऊन येथे येतो, चार ते पाच तास रांगेत उभा राहतो. मात्र, पाच सेंकदात गर्भगृहाच्या समोरून बाजूला केला जातो. त्यात २०० रुपये देऊन दोन तास रांगेत उभे राहणारेही असतात. त्र्यंबकेश्वर येथे दररोज १५ हजार भाविकांचे दर्शन होत असते. अवघे चार सेकंद एका भाविकाला मिळतात. त्यात व्हीआयपी आल्यास आणखी पंचाईत होते.

दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्वदरवाजा बाजूस अद्ययावत सुविधांनी युक्त दर्शनबारी करण्यात आली आहे. याठिकाणी भाविकांना अनेकदा दोन तासांवरही रांगेत उभे राहावे लागते. त्यामध्ये मधुमेह आजार असलेले तसेच ज्येष्ठ, महिला, मुलांना त्रास होतो. हा त्रास दूर करण्यासाठी मंदिर ट्रस्ट विश्वस्तांनी भाविकांसाठी दर्शनानंतर राजगिरा लाडू देण्यात येणार आहेत. तसेच रांगेत बिस्कीट पुडे, पाण्याची बाटली मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790