नाशिक: ७५ हजार रुपये किमतीच्या पैठणी चोरून दोन महिला पसार; प्रकार सीसीटीव्हीत कैद (Video)
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथील एका दुकानात पैठणी चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे.
चोरी केलेल्या तीन पैठणीची किंमत अंदाजे 75 हजार असून दुकानातील स्टॉक तपासत असताना हा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी येवला पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लावण्या पैठणी या दुकानात दोन महिला ग्राहक म्हणून आल्या होत्या.
पैठणी घेण्याच्या बहाण्याने ह्या महिला दुकानात आल्या होत्या. दुकानातील कामगाराने दोघींना पैठणी दाखवत असताना महाराणी प्रकारातील तीन पैठणी या महिलांनी पर्स मध्ये टाकल्या. हे संपूर्ण दृश्य दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.
मात्र महिलांनी पैठणी चोरी केल्याचं कोणाच्याही लक्षात आले नाही. पाच दिवसानंतर जेव्हा दुकानातील साड्या आणि पैठणीच्या साठा तपासला गेला तेव्हा महाराणी प्रकारातील तीन पैठणी कमी असल्याचे लक्षात आले. दुकानातील सर्व सीसीटीव्ही तपासल्या नंतर 12 मार्चला दोन महिलांनी तीन पैठणी पर्स मध्ये टाकून घेऊन गेल्याच समोर आलंय.
सीसीटीव्हीच्या आधारे दुकान मालक दीपक ठोंबरे यांनी येवला पोलीस ठाण्यात तक्रार केली असून येवला पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला चोरांचा पोलीस तपास करत आहे.