दोघा पोलिसांनी लाच स्वीकारताच त्यांना एसीबीने ताब्यात घेतले
नाशिक (प्रतिनिधी): ओझर जवळील कोकणगाव फाटा येथील महामार्ग पोलिस स्थानकातील सहाय्यक निरीक्षक वर्ष कदम आणि नाईक उमेश भास्कर सानप यांच्या विरोधात आठ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार मालेगाव येथील ट्रान्सपोर्ट कंपनीची ३५ वाहने नाशिक ते पिंपळगाव मार्गावर वाहतूक करतात. त्या वाहनांवर कुठलीही कारवाई करू नये, यासाठी कदम आणि सानप यांनी संबंधितांकडे आठ हजार रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर सापळा रचण्यात आला. ठरल्यानुसार कदम व सानप यांनी पैसे स्वीकारण्याचा प्रयत्न करताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास एसीबीचे पथक करीत आहे. दरम्यान लाच घेणे आणि देणे अशा प्रकारांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे अावाहन करण्यात आले आहे.