नाशिक: प्रवेश न घेताच पॅथॉलॉजीची डिग्री ? मुक्त विद्यापीठाच्या नावे बनावट पदवी प्रकरण उघड

नाशिक (प्रतिनिधी): पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यासाठी ‘बीएस्सी एमएलटी’ आणि ‘डीएमएलटी’ या पदव्यांची कागदपत्रे पॅरावैद्यक परिषदेकडे सादर केल्यावर पडताळणीअंती राज्यातील वीस विद्यार्थ्यांच्या पदव्या बनावट असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

याबाबत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या समितीने केलेल्या चौकशीअंती संबंधित विद्यार्थ्यांना कायदेशीर नोटीस बजाविण्यात आली. त्यातून समोर आलेल्या अहवालानुसार विद्यापीठाच्या नावे बनावट कागदपत्रे व पदवी देणाऱ्या राज्यातील चार संशयितांवर नाशिक तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नक्की प्रकरण ?:
मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा कक्षाचे उपकुलसचिव मनोज नारायण घंटे (वय ५२) यांनी विद्यापीठामार्फत पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरव अनिलकुमार शिरसकर (रा. नागपूर), रमेश होनामोरे (रा. सातारा), अशोक ज्ञानदेव सोनवणे (रा. अहमदनगर) आणि संजय गोविंद नायर (रा. नांदगाव) या संशयितांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सन २०२० मध्ये वीस विद्यार्थ्यांनी पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याच्या परवानगीसाठी महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेकडे अर्ज केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

त्यामध्ये सादर केलेल्या पदवी व पदविका गुणपत्रकासह कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली. त्यावेळी परिषदेने विद्यापीठाला विचारणा केल्यावर विद्यार्थ्यांची नोंदणीच नसल्याची बाब उघड झाली. त्यातून परिषदेच्या सूचनेद्वारे विद्यापीठाने या प्रकरणाचा संपूर्ण तपास केल्यावर विद्यार्थ्यांना कायदेशीर नोटिसा बजाविल्या. त्यातून वीसपैकी यवतमाळमधील सात विद्यार्थ्यांनी सेंटर फॉर एज्युकेशनच्या संशयित शिरसकरकडून, ठाणे जिल्ह्यातील तिघांनी साताऱ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील होनामोरेकडून, अहमदनगरच्या एकाने सोनवणेकडून आणि जळगाव, मनमाडच्या दोन विद्यार्थ्यांनी नायरकडून कागदपत्रे तयार करून घेतली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन

वकिलाच्या नोटीसला उत्तर दिलेल्या चौदापैकी एकाने उत्तरात कोणत्याही संशयिताचे नाव घेतलेले नाही. उर्वरित सहा विद्यार्थ्यांनी अद्याप नोटीसला उत्तरचं दिलेले नाही. दरम्यान, सन २०२१ पासून संबंधित दोन्हीही अभ्यासक्रम ‘यूजीसी’च्या निर्देशानुसार मुक्त विद्यापीठाने बंद केलेले आहेत.

अहवालाअंती नोटिसा:
५ ऑक्टोबर २०२० आणि ४ जानेवारी २०२१ रोजी पॅरावैद्यक परिषदेने ‘बीएस्सी एमएलटी’च्या अठरा आणि ‘डीएमएलटी’च्या दोन विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्र पडताळणीसाठी मुक्त विद्यापीठाकडे पाठविली. त्याला १० ऑक्टोबर २०२० आणि २५ जानेवारी २०२१ रोजी विद्यापीठाने ई-मेलद्वारे उत्तर देत संबंधित विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडे नोंदणीच नसल्याचे स्पष्ट केले. ९ मे २०२२ रोजी याप्रकरणी प्रथमदर्शनी तक्रार करण्याबाबत परिषदेने कळविले. तत्कालीन कुलगुरू प्रशांत पाटील यांनी त्रिसदस्य समिती गठीत केली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जमीन हडपून खंडणीची मागणी; लोंढे पिता-पुत्रासह पाचजणांवर गुन्हा

३० डिसेंबर २०२२ रोजी समितीने सविस्तर अहवाल दिला. त्यानुसार, ‘बीएस्सी एमएलटी’ विद्यार्थ्यांची नोंदणी विद्यापीठाकडे नाही. कायम नोंदणी क्रमांक, गुणपत्रक, पदवी प्रमाणपत्र, लेटरहेड सर्व बनावट आहे. ‘डीएमएलटी’च्या विद्यार्थ्यांची नोंदणी सुधारित अभ्याक्रमानुसार ‘डीएलटी’साठी होती. ते दोघेही परीक्षा उत्तीर्ण आहेत. परंतु, त्यांनी सादर केलेली कागदपत्रे अवैध आहेत. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांवर तत्कालीन उपकुलसचिव जयवंत खडताळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

२९ जानेवारी २०२१ ला खडताळे निवृत्त झाले आहेत. त्यांच्या पडताळणीसह जबाबानुसार स्वाक्षऱ्या त्यांच्या नाहीत. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वकील सुनीता लाड यांनी मे आणि जून २०२३ मध्ये कायदेशीर नोटिसा पाठविल्या. नोटिसांना वीसपैकी चौदा विद्यार्थ्यांनी उत्तरे देत कागदपत्रे तयार केलेल्या संशयितांची नावे उघड केली.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here