ललित पाटीलसह तिघांना 13 नोव्हेंबरपर्यंत कोठडी
पुणे (प्रतिनिधी): ड्रग्ज माफिया ललित पाटील, नाशिक येथील कंपनीला केमिकल कच्चा माल पुरवठा करणारा शिवाजी शिंदे व ड्रगनिर्मितीत मदत करणाऱ्या रोहितकुमार चाैधरी या तिघांच्या पोलिस कोठडीत १३ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी सत्र न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या मोक्का न्यायालयात तपास अधिकारी एसीपी सुनील तांबे यांनी तिन्ही आरोपींना हजर केले होते. या वेळी पोलिसांनी गुजरात, भिवंडी येथील गोदामातून शिवाजी शिंदे मेफेड्रोन उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे १० केमिकलचा पुरवठा वेळोवेळी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे.
सरकारी वकील विजय फरगडे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, नाशिकमध्ये एमडी उत्पादन करण्यासाठी आरोपी शिवाजी शिंदेने रसायनांचा पुरवठा केलेला आहे. त्याचा अधिक तपास करायचा आहे. दरम्यान, बचाव पक्षातर्फे ऍड. संदीप बाली, ऍड. सचिन काटे, ऍड. विवेक राजकोडे यांनी बाजू मांडली.
पुरवठा करणाऱ्यांचा शोध:
शिवाजी शिंदे हा गुजरातमधील वडोदरा येथील डीके सायंटिफिक कंपनीतून तसेच मुंबई व भिवंडी येथील गोदामातून एमडी ड्रगनिर्मितीसाठीचे १० केमिकल घेत होता. यामध्ये ऍसिटोन, टुलिन, ऍल्युमिनिअम क्लोराइड, ब्रोमीन, हायड्रोक्लोरिक ऍसिड, प्रोपोनिल क्लोराइड, मनोमिथेलामाइन, ४० %, क्लोरोफाॅर्म, काॅस्टिक सोडा, सोडा अॅश या केमिकलचा समावेश होता. नेमके हे केमिकल शिंदेला कोण पुरवठा करत होते, याचा तपास सुरू आहे.
आरोपींचा समोरासमोर तपास:
तपास अधिकारी एसीपी सुनील तांबे यांनी न्यायालयास सांगितले की, या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण १४ आरोपी निष्पन्न झाले आहेत. या सर्व आरोपींचा एकत्रितरीत्या समोरासमोर तपास करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने संबंधित आरोपींचे प्रॉडक्शन वॉरंट न्यायालयाकडून घेण्यात आले. या गुन्ह्यातील स्वरूप पाहता पुणे, मुंबई व नाशिक अशा कनेक्शनमधून ते कोणत्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय टोळीशी संपर्कात आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत.