कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सातपूर अंबड लिंक रोडचा काही भाग प्रतिबंधित !

नाशिक (प्रतिनिधी):  नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोड येथील ६३ वर्षीय महिला गुरुवारी (दि.१६ एप्रिल २०२०) कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. ही महिला संजीव नगर भागातील आहे. त्यामुळे सातपूर-अंबड लिंकरोडवरील संजीव नगर परिसरातील पाचशे मीटरपर्यंतचा भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम आता महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने हाती घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शहरात गोविंदनगर जवळील मनोहरनगर, नवशा गणपती मंदिर आणि नाशिकरोड परिसरात करोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यापाठोपाठ समाजकल्याण वसतीगृहातील शेल्टर होममध्ये मुंबईहून आश्रयास थांबलेल्या एका नागरिकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे पौर्णिमा चौक, व्दारका आणि काठेगल्ली हा परिसरसुद्धा सील करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

सातपूर अंबड लिंक रोड वरील प्रतिबंधित करण्यात आलेला परिसर

गुरुवारी (दि. १६) सातपूर-अंबड लिंकरोड परिसरातील ६३ वर्षीय महिला गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. सातपूर-अंबड लिंकरोडवरील ६३ वर्षीय महिलेचा मुलगा पुण्याहून नाशिकला आला होता. तो करोना निगेटिव्ह असला तरीही त्याच्या माध्यमातून करोनाचा विषाणूची बाधा त्याच्या आईला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या रुग्णामुळे सातपूर-अंबड लिंकरोडवरील प्लॉट क्रमांक ४२, संजीवनगर, दक्षिणमुखी मारुती मंदिर या परिसरातील ५०० मीटर क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्ती घर सोडून बाहेर येऊ शकणार नाही. तसेच बाहेरचा कोणीही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रात जाऊ शकणार नाही. या आदेशाचे पालन न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांवर विनाकारण फिरणारे किंवा वाहने आणणारे यांच्यावरही नाशिक शहर पोलीस कलम १८८ प्रमाणे कारवाई करत आहेत. त्याचप्रमाणे कामासाठी बाहेर पडतानाही मास्क न घातल्यास पोलीस गुन्हे दाखल करत आहेत. येत्या ३ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790