नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील टाकळी रोड भागात खाद्यपदार्थाचे दुकान फोडून पावणेदोन लाखाचे खाद्यपदार्थांवर डल्ला मारण्यात आला.
टेकचंद मगरमलानी यांची टाकळी रोड येथील काठे मळा अनमोल फूड्स दुकान आहे. शुक्रवारी (ता. ४) सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता, कुलूप तुटलेले आढळले.
दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. सर्व सामानाची पाहणी केली असता ३१ किलो बटर आणि २४ किलो चीजचे सुमारे १ लाख ४५ हजार ४४० रुपयाचे खाद्यपदार्थ अज्ञात संशयितांनी चोरून नेल्याची खात्री झाली. श्री. मगरमलानी यांनी भद्रकाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळास भेट देत पाहणी केली.
त्यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या तीन दिवसातील घरफोडीची तिसरी घटना आहे.
गुरुवारी (ता.३) काठे गल्ली येथील घरात सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे साडेआठ लाखांचा ऐवज चोरी गेला होता.
ट्रॅक्टर हाऊस परिसरात बंद घराचे कुलूप तोडून घरातून सुमारे ५० हजाराचा ऐवज लंपास करण्याची घटना ताजी असतानाच शनिवारी काठे मळा येथील दुकान फोडून खाद्यपदार्थ चोरी झाल्याची घटना घडली. तीन दिवसात तीन घरफोडी करून संशयितांनी जणू पोलिसांना आव्हान दिले आहे.
![]()
