नाशिक (प्रतिनिधी): शिर्डीच्या साईबाबा संस्थानामधील काही विषयांची जोरदार चर्चा सुरू आहे. यात चर्चेचा महत्वाचा विषय असा की, मंदिरासमोर प्रवेशद्वारावर ‘सभ्यतापूर्ण पोशाख अथवा भारतीय संस्कृतीस अनुसरून पोशाख परिधान करून दर्शनाकरीता यावे‘ असे आवाहन करणारा फलक लावला आहे. यावर अनेक भाविकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये १५,५०६ भाविकांनी या फलकास सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या तर ९३ भाविकांनी याला आपला विरोध दर्शविला आहे. विरोध करणाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, हे व्यक्तिस्वातंत्र्यावर बाधा आणते आहे. अशी माहिती संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी दिली.
तृप्ती देसाई यांनी या आवाहनाला आव्हान देऊन हे फलक लवकरात लवकर हटवावे, असे म्हटले होते. नाहीतर त्या स्वतः येऊन हे फलक हटवणार असा इशाराही त्यांनी दिला होता. याच मुद्द्यावरून प्रशासनाने त्यांना शिर्डी मध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली. या मागचा हेतू फक्त कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये एवढाच होता.
याच मुद्द्यावरून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये. यासाठी तृप्ती देसाई यांना ११ डिसेंबरपर्यंत शिर्डीत प्रवेशबंदीचा आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. शिर्डीला दर्शनासाठी येणाऱ्या लोकांचा सभ्य पोशाख नसतो. अशी तक्रार भाविकांनी संस्थानाच्या प्रशासनाकडे केली होती. त्यावरचं उपाय म्हणून संस्थानाने तो फलक लावला होता व लोकांना आवाहन केले होते. याबाबत कुठलीही सक्ती नसून हे फक्त आवाहन आहे.