नाशिक (प्रतिनिधी): श्री सप्तशृंगी देवी निवासिनी ट्रस्ट व नाशिक रनर्स आयोजित सप्तशृंगी हिल मॅरेथॉन २०२३ सातवे पर्व ३ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न होणार असून यावर्षी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट हंट प्रकारात ३ किमीची मॅरेथॉन स्पर्धेचा यात प्रथमच समावेश करण्यात आला आहे.
आरोग्य जनजागृती सह दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थी – विद्यार्थिनींना मैदानी क्रिडा प्रकारातील संधी उपलब्ध करणे तसेच निसर्ग व पर्यटन विकासाच्या उद्देशाने श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व नाशिक रनर्स, नाशिक आदींच्या संयुक्तिक सहयोगातून वर्ष २०१७ पासून सप्तशृंगी हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करते.
स्पर्धेचे हे ७ वे वर्ष असून श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड व नाशिक रनर्स, नाशिक यांचे वतीने तसेच ग्रामपंचायत श्रीक्षेत्र सप्तशृंगगड व ग्रामपंचायत नांदुरी तसेच व्यापारी संघटनेच्या सहयोगाने सदर स्पर्धा ही रविवार, ता ३ डिसेंबर २०२३ रोजी ही स्पर्धा २१ कि.मी. स्त्री/पुरुष, १० कि.मी. स्त्री/पुरुष व ५ कि.मी. स्फुर्ती रन स्त्री/पुरुष अश्या प्रकारात होणार आहे.
या स्पर्धेचा मार्ग नांदुरी पायथ्यापासून सप्तशृंगी गड व परत नांदुरी पायथ्यापर्यंत असून सकाळी ६.०० वा. स्पर्धेला प्रारंभ होईल. तसेच परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी १२, १४ व १६ या वयोगटासाठी ३ किमी टॅलेंट हंट प्रकारात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
स्पर्धेचे तांत्रिक पूर्तता ही नाशिक रनर्स, नाशिक यांसह इतर अनुभवी संस्थांच्या मार्फत उपलब्ध केले जाणार आहे. स्पर्धकांनी त्यांच्या सहभागाची नोंदणी ही www.shmnashik.com या संकेतस्थळावर वरती दि. १५ ऑक्टोबर, २०२३ पूर्वी करावी.
असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड, नासिक रनर्स नासिक, ग्रामपंचायत सप्तशृंगगड, ग्रामपंचायत नांदुरी व व्यापारी संघटना प्रयत्नशील आहे.