नाशिक (प्रतिनिधी): नवरात्रोत्सव काळात सप्तशृंगी गडावर देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर हे २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला.
३ ते १२ आक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय व निमशासकीय विभागाची यात्रा नियोजन आराखडा आढावा बैठक शुक्रवारी (ता. २०) झाली. बैठकीत विविध निर्णयांसह सर्व विभागांनी आपली जबाबदारी चोख पार पाडण्याचे आदेश देण्यात आले.
नवरात्रोत्सवात नऊ ते दहा लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील असा अंदाज प्रशासनाच्यावतीने व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सर्वांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर २४ तास खुले राहणार आहे. तसेच गडावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी टोल नाक्यावर करावी, गडावर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचा वापर टाळावा अशा सूचना करण्यात आल्या आहे. ट्रस्टतर्फे श्री भगवती मंदिर, सभा मंडप, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य, मोफत महाप्रसाद व्यवस्था तसेच परिसर बंदोबस्त, साफसफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, करण्यात येणार असल्याची माहिती सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली.
सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही: सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर व शिवालय तलावाच्या परिसरात एकूण ६५ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच पहिल्या पायरीजवळ दोन व मंदिरात दोन असे चार मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहे. दरम्यान प्रदक्षिणा मार्ग बंद करण्यात आला आहे.
बैठकीतील ठळक मुद्दे: नांदुरी येथे वाहनतळयात्रोत्सवात खासगी वाहनांना बंदी, महत्त्वाच्या वाहनासाठी पासेस, स्वच्छतेसाठी कंत्राटी कामगार, वैद्यकीय सुविधा, रूग्णवाहिका, परिवहन महामंडळातर्फे ३७५ बसेस, अपघाती वळणाला वाहतूक नियंत्रण कक्ष, पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन