नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सणासुदीची संधी साधून शहरातील उपनगरामधील गल्लोगल्लीत फोमची गादी असल्याचे सांगून थर्माकोलच्या गाद्यांची विक्री करणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे.
त्यामुळे अशा वस्तू खरेदी करण्यापूर्वी नागरिकांनी वस्तुची संपूर्ण तपासणी, चौकशी करावी, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सण उत्सवाचे दिवस असल्याने शहरातील अनेक भागांमध्ये शहरात साडी, बेडशीट, पिलो कव्हर, गॅस शेगडी, गाद्या काही फेरीवाले हातामध्ये घेऊन फिरत आहे. यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोक आहे.
सदर वस्तू या ब्रँडेड कंपनीच्या असल्याचा दावा देखील हे विक्रेते करीत आहे. शनिवारी दुपारी एक विक्रेता पेठरोडवर शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड जवळील पेट्रोल पंपालगत रस्त्यावर नामांकित असलेल्या कंपनीच्या गाद्याची विक्री करत होता.
फोम गादी स्वस्तात मिळत असल्याने काही ग्राहकही खरेदीसाठी जमले होते. त्याचवेळी मनसे पदाधिकारी कैलास मोरे, अर्जुन वेताळ, संदीप दोंदे, देवचंद केदारे, शंकर कनकुसे, संदीप मालोकर हे या ठिकाणाहून जात असताना त्यांना या फोमच्या गादीबाबत संशय आल्याने त्यांनी थांबून सर्व गाद्यांची तपासणी केली असता या गाद्यांमध्ये फोम ऐवजी थर्माकोल निष्पन्न झाले.
त्यानंतर त्यांनी संबंधित विक्रेत्यांकडे ओळखपत्र म्हणून आधारकार्डची विचारणा केली असता त्यांच्याकडे ते मिळून आले नाही. त्यांच्यासमवेत चर्चा करत असताना ते परप्रांतीय असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मनसे पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पोलिस प्रशासनाकडेही तक्रार केली असून, नाशिककरांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.