पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली स्थगित
नाशिक (प्रतिनिधी): ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांच्या बदलीला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना पाटील यांची बदली झाल्याने शेतकरी संघटनांनी बदलीच्या विरोधात ती रद्द करण्याच्या मागणीची निवेदने दिली होती.
सप्टेंबर २०२० मध्ये अधीक्षक आरती सिंह यांच्याकडून पाटील यांनी पदभार स्वीकारला होता. कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना डिसेंबरअखेर बदलीबाबत निर्णय घेऊ नये, अशी टिपण्णी करून एका आमदाराच्या पत्रानुसार ही बदली करण्यात आल्याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
या बदलीविरोधात पाटील यांनी उच्च न्यायलयात धाव घेतली होती. सोमवारी (दि. २०) न्यायालयाने पाटील यांच्या बदलीला स्थगिती दिली. शासनाने पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण नसताना बदली केली. त्यांच्या जागेवर शहाजी उमाप यांची बदली करण्यात आली होती. ते मंगळवारी पदभार स्वीकारणार असल्याची चर्चा होती. मात्र तत्पूर्वीच न्यायालयाने पाटील यांच्या बाजूने निकाल दिला.
त्यात डिसेंबरपर्यंत त्यांची बदली करण्यात येऊ नये, असेही आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, ‘अधीक्षक सचिन पाटील यांची बदली रद्द करा, जिल्हा वाचवा’ अशी हाक देत शासनाच्या बदली आदेशाविरुद्ध शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी निवेदने दिली होती. ही बदली रद्द न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही करण गायकर, तुषार जगताप, नितीन काळे, कॉ. राजू देसले, शरद तुंगार यांच्यासह शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिला होता. दरम्यान, स्थगितीच्या निकालानंतर सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलण्यास तसेच कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.