नाशिक (प्रतिनिधी): गेल्या गुरुवारी (ता. २७) रात्री नाशिकरोडला एका व्यावसायिकाला कारमध्ये बसवून त्यास एअरगणचा धाक दाखवून त्याच्याकडील ऐवज, रोख रक्कम व एटीएमचा वापर करून ९७ हजारांची लुट करणार्या संशयिताच्या शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने शहापूरमधून मुसक्या आवळल्या आहेत.
किरण परशुराम गोरे (२४, रा. बामणे, आवरे, ता. शहापूर, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एअरगन, बँकाचे डेबिट कार्ड, चोरीचा मोबाईल असा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.
शिवाजी बापूराव पवार (रा. नाशिकरोड) यांचा नाशिकरोडच्या गांधी रोडवरील चोरडिया सदनमध्ये ऑनलाईन पैसे पाठविण्याचा व्यवसाय आहे. गेल्या २७ तारखेला रात्री आठ वाजता त्यांनी दुकान बंद केले असता, त्यावेळी संशयित किरण याने दवाखान्यात अर्जंट पैसे पाठवायचे असल्याचे सांगत गळ घातली.
त्यासाठी कारमध्ये बसले असता संशयिताने त्याच्याकडील एअरगनचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत कार दारणा हॉटेलकडे नेली.
तेथे त्याने पवार यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, मोबाईल, रोकड आणि एटीएम कार्ड घेऊन त्यावरून पैसे काढत असा सुमारे ९७ हजार रुपयांची लुट केली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हेशाखा युनिट एक करीत असताना, रविवारी (ता. ३०) सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांना संशयित किरण गोरे शहापूरचा असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने शहापूरातून संशयिताला जेरबंद केले. सदरची कामगिरी युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, संदीप भांड, महेश साळुंके, विशाल काठे, राजेश राठोड, किरण शिरसाठ यांनी बजावली.
51 Total Views , 1 Views Today