सई जाधव, नाशिक
चीनच्या वूहान शहरातून उत्पन्न झालेला कोरोना सगळ्या जगालाच महागात पडलेला दिसतोय. या कोरोनामुळे जागतिक महामारीच्म मोठं संकट जगावर ओढावल, या जागतिक महामारीमुळे सर्वाधिक मोठ नुकसान झालं ते सर्वसामान्यांच म्हणजेच हातावर पोट असणाऱ्यांचं… बारा तासाच्या रोजंदारी नंतर हातात येणाऱ्या रोजच्या पैशावर घरातील किरणा भरून पोट भरणाऱ्या सर्वसामान्यांचा मोठा प्रश्न आहे. तो आता पुढे काय…?
त्यातलाच एक रिक्षाचालक वर्गदेखील.. रिक्षाचालकांची व्यथा तर निराळीच.. बरेच लोक शहराच्या जवळपासच्या गावातील..तर काही दूरवरून आपल्या कुटुंबासह शहरात पोट भरायला आलेले.. एक भाड्याची खोली, मोजका संसार आणि पोट भरण्यासाठी कर्ज काढून घेतलेली रिक्षा.. खरं तर त्यांच्यासाठी त्यांची रिक्षा म्हणजे कुटुंबातील एक सदस्याच.. स्वत:च्या घरातील कामासाठी, वेळप्रसंगी सर्व कुटुंबाला घेऊन प्रवास करणार.. ऊन, वारा असो किंवा पाऊस.. डोक्यावर छत म्हणून आणि पोटाची खळगी भरणारी रिक्षा सध्या त्यांच्या भाड्याच्या घरासमोर रिकामी उभी आहे.. कधी विचार करून बघितला, की या रिक्षाचालकांच्या मनात सध्या काय चालू असेल ?
लॉकडाऊन मधला सबंध वेळ त्यांच्या रिक्षात बसून विचार करत असतील.. नव्हे, खरं तर विचारांचं काहुरच माजलं असेल.. दोन महिने जागेवरच उभी असणारी रिक्षा ते न चुकता रोज धुतात, पुसतात.. नाही म्हंटलं तरी रोजचा दिवस तारून जाईल इतकाच नफा ते कमावतात…आणि आता गेल्या महिन्या दीड महिन्यापासून तर ते ही बंदच आहे… त्यामुळे रिक्षाचालकाचं दैनंदिन आयुष्य सध्या प्रचंड अडचणीत आहे.. सध्या कुणी मदत केली तर घर चालतंय..
काहींनी बायकोचं मंगळसूत्र गहाण टाकलाय कारण, सेविंग्स नाहीत,.. बायका मुलं काय खाणार, कसे जगणार.. अजून थोडे दिवस धीर धरू आणि मग पुन्हा जोमाने रिक्षा घेऊन रस्त्यावर उतरू.. अशी एक आशा रिक्षाचालक सध्यातरी उराशी बाळगून आहेत…