नाशिक (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील इरसाळवाडी गावात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने काजी गढीची पाहणी करून स्थानिक नागरिकांना समाजमंदिरात स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या.
पालकमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात सूचना दिल्या होत्या.गेल्या अनेक वर्षांपासून काजी गढी येथे धोकादायक घरे आहे. गडीला संरक्षक भिंत बांधण्यासंदर्भातील विषयदेखील अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे पावसाळा आला की गडी व संरक्षक भिंतीचा विषय चर्चेला येतो.
दरवर्षी महापालिकेच्या विभागीय कार्यालयांकडून नोटीस देऊन सोपस्कार पार पाडला जातो. या वर्षीदेखील जवळपास गढी येथील शंभरहून अधिक घरांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्याच्या इरसाळवाडी येथे गुरुवारी (ता. २०) सकाळी जमीन खचण्याची दुर्घटना घडली. यात आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले, तर बाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन. डी यांना तातडीने सूचना देऊन नाशिक शहरातील काझी गढी या धोकादायक भागाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने पश्चिम विभागाचे अतिक्रमण विभागाचे निरीक्षक विनय जाधव व अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रवीण बागूल यांनी धोकादायक भागाची पाहणी केली. धोकादायक गढी असल्याने सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या. या वेळी स्थानिक नागरिकांच्या रोषालादेखील सामोरे जावे लागले.