नाशिक (प्रतिनिधी): राज्यात २० ते ३० ऑगस्ट आणि १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत चांगल्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र अभ्यासकांनी वर्तवला आहे. मॉन्सूनच्या सर्वदूर हजेरीची प्रतीक्षा यातून संपण्याचा विश्वास अभ्यासकांना वाटत आहे.
पावसाची गरज असलेल्या नाशिक जिल्ह्यात शनिवार (ता. १२)पासून १६ ऑगस्टपर्यंत हलक्या पावसाची शक्यता इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्राने वर्तविली आहे.
द्राक्ष उत्पादकांसाठी हवामानाचा अभ्यास करणाऱ्यांनी राज्यातील आगामी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या अभ्यासकांकडून सद्यःस्थितीत परतीच्या पावसाच्या शक्यतेचा अभ्यास सुरू आहे. त्यातून आणखी पावसाची सविस्तर माहिती पुढे येण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात पाच दिवस आकाश ढगाळ राहणार असून, तापमान कमाल २७ ते २९ आणि किमान २१ ते २२ अंश सेल्सिअस, वाऱ्याचा वेग तासाला १९ ते २६ किलोमीटर राहण्याची शक्यता इगतपुरी केंद्राने वर्तविली आहे.
या केंद्रातर्फे शुक्रवारी (ता. ११) जिल्ह्यातील एक अथवा दोन ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा तासाला ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
शुक्रवारी शहराच्या विविध भागांत काहीवेळ पावसाच्या सरी पडल्या. पावसाचा अंदाज लक्षात घेता, नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेकडील अवर्षणप्रवण व मध्य भागातील मैदानी प्रदेशात खरीप पिकांना संरक्षित पाणी द्यावे. अथवा दोन टक्के यूरिया अथवा पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी, असा सल्ला केंद्राच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.