नाशिक (प्रतिनिधी): पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
कपाशी, मका, बाजरी, सोयाबीन आदी पिके जागेवरच करपल्याने शेतकऱ्यांना पुन्हा बियाणे खरेदी करण्याची वेळ आल्याचे चित्र जिल्ह्याभरात दिसून येते.
नाशिक जिल्ह्यात खरिपाची ९१.५८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. जुलैअखेर खरिपाची पेरणी होते. त्यानंतर लेट खरीप व रब्बीचा हंगाम सुरू होतो. या काळात लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते.
हा कांदा चांदवड, येवला, नांदगाव, मालेगाव या भागात मोठ्या प्रमाणात घेतला जातो. तर कळवण, देवळा, सटाणा या भागात लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याची लागवड होते.
लाल कांदा (पोळ) लागवडीयोग्य रोप तयार झालेले असले तरी अत्यल्प पावसामुळे विहिरींना पाणी आलेले नाही. त्यामुळे कांद्याची लागवड रखडली असून, रोप जागेवरच पिवळे पडत आहे. जूनमध्ये झालेल्या रिमझिम पावसाच्या भरवशावर मका व कपाशीची लागवड केली.
पण पावसाअभावी ही पिकेही शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. गुडघ्याएवढ्या उंचीची ही पिके जागेवरच करपत असल्याने गुरांना चारा म्हणून त्याचा वापर केला जात आहे.
जूनमध्ये पेरणी केलेली बाजरी व्यवस्थितरीत्या उगवली नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी जुलैमध्ये दुबार पेरणी केली. पाऊस न पडल्यामुळे बाजरीही जागेवरच सुकली. यात मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवड, बागलाण, सिन्नर या तालुक्यांमधील बहुतांश भागाची पिके हातातून गेली आहेत.
त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये संमिश्र परिस्थिती दिसून येते. रिमझिम पावसावर येथील पिके जिवंत आहेत. श्रावणसरीशिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही.
पिके करपली:
जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण सहा लाख ४१ हजार ७७१ हेक्टरवर खरिपाची पेरणी होणे अपेक्षित आहे. त्यापैकी पाच लाख ८७ हजार ७५१ हेक्टरवर (९१.५८ टक्के) पेरणी झाली आहे. यापैकी बहुतांश ठिकाणची पिके पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत.