नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी ते कसारादरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे कपलिंग अचानक तुटल्याने मालगाडीचे काही डबे वेगळे झाले.
ही बाब ड्युटीवर असलेल्या दोन ट्रॅकमनच्या लक्षात आल्याने त्यांनी प्रसंगावधान राखत मालगाडीच्या चाकात दगड अडकविल्याने मागे घसरणारी मालगाडी रुळावरच थांबल्याने मोठा अनर्थ टळला.
गेल्या शनिवारी (दि. २२) दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. मध्य रेल्वेच्या कसारा घाटात गाड्या पावसाळ्यात सुरळीत सुरू राहाव्यात, यासाठी ट्रॅकमनची नियुक्ती केली जाते. त्यानुसार या मार्गावर मंगेश आव्हाड व संजय उगले या दोन ट्रॅकमनची शनिवारी ड्युटी होती.
दुपारी तीन वाजेच्या सुमारास इगतपुरी ते कसारादरम्यान मुख्य मार्गावर एक लोडिंग मालगाडी मुंबईच्या दिशेने निघाली होती. गाडीने अजूनही गती घेतलेली नव्हती, याचवेळी मालगाडीचे कपलिंग (दोन डब्यांना जोडणारा सांधा) तुटल्याने गाडीचे काही डबे वेगळे झाले.
याच दरम्यान रेल्वे रुळावर ड्युटीवर असलेल्या आव्हाड आणि उगले यांच्या लक्षात ही बाब आली. गाडी हळूहळू पुढे सरकत होती, तर डबे गाडीपासून अलग होत झाले होते. उगले हे विरूद्ध दिशेने धावत जात त्यांनी डब्याला प्रोटेक्ट करीत त्याबाबतची सूचना त्यांनी तत्काळ वरिष्ठांना कळविली.
याचवेळी मंगेश आव्हाड यांनी जवळील एक मोठा दगड आणून मालगाडीच्या चाकात अडकविला. त्यामुळे कपलिंग तुटलेले डबे रुळावरच स्थिर राहिल्याने डबे घसरण्याचा मोठा धोका टळला. या दोन्ही ट्रॅकमनच्या धाडसामुळे अपघात टळल्याने त्यांचे कौतुक होत आहे.