नाशिक (प्रतिनिधी): भारतीय रेल्वेने तिकिटांचे आरक्षण करण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता रेल्वेचे तिकीट फक्त ६० दिवस आधी करता येईल. याआधी प्रवासाच्या तारखेच्या १२० दिवस आधी तिकीट बुक करता येत होते. हा नवा नियम १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होणार आहे. त्यामुळे ३१ ऑक्टोबरपर्यंत झालेल्या आरक्षणावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेण्यामागे कोणतेही कारण सांगितले नाही.
या संदर्भात रेल्वेने जारी केलेल्या पत्रकानुसार, १ नोव्हेंबर २०२४ पासून यात्रा करण्याचा दिवस वगळून तिकीटाचे बुकिंग ६० दिवस आधी करता येईल. या पत्रकात असे देखील म्हटले आहे की, १२० दिवसापर्यंतच्या बुकिंगचा नियम ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत लागू असेल. रेल्वे बोर्डाचे निर्देशक (पॅसेंजर मार्केटिंग) संजय मूनचा यांनी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत.
६० दिवस आधी करण्यात आलेल्या तिकीटाचे बुकिंग रद्द करण्याची परवागी देखील असेल. याच बरोबर ज्या रेल्वे गाड्यांच्या बुकिंगचा कालावधी आधीपासून कमी आहे, अशा गाड्यांना हा नियम लागू असणार नाही. यात गोमती एक्स्प्रेस आणि ताज एक्स्प्रेस अशा गाड्यांचा समावेश आहे. विदेशी पर्यटकांना रेल्वेचे बुकिंग करण्यासाठी ३६५ दिवसांचा कालावधी असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
१२० दिवसांमुळे लोकांना तिकीट बुक करण्यासाठी आणि ते कंफर्म होण्यासाठी बराच वेळ मिळत होता. आता ६० दिवसांचा कालावधी करण्यात आल्याने प्रवाशांना थोडी अडचण होण्याची शक्यता आहे.
प्रवासाच्या चार महिने आधी करण्यात आलेले बुकिंग अनेकदा रद्द केले जातात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. आता २ महिने आधी बुकिंग केल्याने तिकीट रद्द होण्याची शक्यता कमी होऊ शकेल असा अंदाज आहे.