नाशिक (प्रतिनिधी): शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी १४ ते २८ जुलै या दरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मनाई आदेश लागू केले आहेत.
राज्यातील सत्ता बदलामुळे अजूनही राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्याचप्रमाणे सण-उत्सवात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्ष, गट यांच्याकडून मोर्चे, निदर्शने, बंद पुकारणे, आंदोलने केली जातात.
या साऱ्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता कायम राहावी, व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी शहर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी १४ ते २८ जुलै यादरम्यान १५ दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू केले आहेत.
त्यानुसार नागरिकांना कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाही. दगड, शस्त्र, लाठ्या,बंदुका बागळता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा प्रतिमेचे पद्रर्शन किंवा दहन करता येणार नाही.
आरडाओरड, वाद्य वाजवण्यास बंदी असेल. प्रक्षोभक भाषण, वर्तवणूकीस बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून फिरणे, पेढे वाटणे, फटाके फोडणे, घंटानाद करणे, शेरेबाजी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
पुर्वपरवानगी शिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणारे महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र राहतील असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे