नाशिक (प्रतिनिधी): सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत, समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. आज त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. १ जून १९६३ ला त्यांचा जन्म झाला होता.
मुंबईतील एशिअन हार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मागील वर्षभरापासून हरी नरके आजारी होते. त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात १५-२० दिवस दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एक-दोन महिन्यापूर्वी राजकोट येथील रुग्णालयात गेले होते. तिथे त्यांची प्रकृती स्थिर झाली होती.
आज ते मुंबईला येत असताना प्रवासात सहा वाजताच गाडीत त्यांना दोन उलट्या झाल्या. त्यानंतर समिर भुजबळ यांनी ड्रायव्हरला एशियन हार्टला घेऊन जाण्यास सांगितलं, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.
प्रा. हरी नरके यांनी विपुल लेखन केले आहे. फेब्रुवारी २०११ पासून ते ब्लॉग लिहितात. सोशल मीडियावर ते सतत सक्रीय होते. त्यांचे अनेक लेख काही वर्तमानपत्रांतही प्रसिद्ध झाले आहेत.
छगन भुजबळ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा तरुणांपर्यत पोहचविण्याचे काम नरके यांनी केले. त्यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केल्यामुळे वैचारिकतेत मोठी भर पडत गेली. त्यांचे जाणे खूप क्लेशकारक आहे. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातील पुरोगामी विचार चळवळीची मोठी हानी झाली आहे. नरके यांची वैचारिकता आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी राहील. अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.
भुजबळ म्हणाले, “हरी नरके यांनी अनेक पुस्तकांचा अभ्यास करत तारीख-वार याबाबत वादविवाद करून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं काम लोकांना पटवून दिलं. त्यांच्यासारखा अभ्यास करणारा, इतिहासात जाऊन शोधणारा कोण भेटणार आहे?”
![]()


