नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): ससून रुग्णालयातून पळून गेलेला ड्रग्जतस्कर ललित पाटील याच्यासह त्याचा भाऊ आणि अन्य आरोपींच्या नाशिक येथील घरांची पुणे पोलिसांनी झडती घेतली. तेथून पेनड्राइव्ह आणि मोबाइल जप्त करण्यात आले असून, त्यातील डेटाचे विश्लेषण करण्यात येत आहे, अशी माहिती पुणे पोलिसांकडून सोमवारी न्यायालयात देण्यात आली.
काय आहे प्रकरण?:
या गुन्ह्यात सुभाष मंडल (वय २९, रा, देहू रस्ता, मूळ रा. झारखंड) आणि ससून रुग्णालयाच्या कँटिनचा कर्मचारी रौफ रहीम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता) यांना अटक करण्यात आली आहे. ललित पाटीलला पुण्याबाहेर जाण्यासाठी ‘लिफ्ट’ देणारा कारचालक दत्ता डोकेलाही अटक करण्यात आली आहे.
पाटीलचा भाऊ भूषण सुभाष पाटील (रा. नाशिक) आणि अभिषेक विलास बलकवडे यांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. मंडल आणि शेख यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी हजर करण्यात आले.
आरोपींनी पाटीलच्या मदतीने इतर कोणाला अमली पदार्थ विकले आहेत का याचा तपास करायचा आहे, गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने अटक आरोपींकडे तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील वामन कोळी यांनी केला. तो ऐकून दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
पासवर्ड न मिळाल्याने अडथळे:
‘ससून’मध्ये दाखल असताना शहर पोलिसांनी ललित पाटीलकडील दोन मोबाइल जप्त केले होते. त्या मोबाइलचे पासवर्ड पोलिसांना सांगण्यास पाटीलने नकार दिला होता. त्यामुळे मोबाइल ‘अनलॉक’ करण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याला यश आले नाही. पासवर्डसाठी मोबाइल तयार करणाऱ्या कंपनीशीही देखील संपर्क साधण्यात आल्याचे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या रिमांडमध्ये म्हटले आहे.